पेशेंट म्हणुन आलात देवा

                                    पेशेंट म्हणुन आलात देवा,               थोडा पेशेंस ठेवा ना;
                                    चार दिवस काढलेली कळ,               अजुन थोड़ी सोसा ना!
                                    डॉक्टर काही देव नाही,                    चमत्कार त्याला मागु नका;
                                    चमत्कार नाही केला म्हणुन,           दानव त्याला बनवु नका.
                                    दुःखाचा बोजा तुमचा,                     जरूर त्याला पेलायला दया;
                                    आभार त्याचे मानून एकदा,            त्याच्या आनंदाचे श्रेय लाटून घ्या!
                                    रोग पळाला, जीव वाचला,               पैसाच का दिसतो तुला ?
                                    जर काहीच बिघडले नव्हते बाबा,     तर घरीच तुझ्या का नाही निजला?
                                    गरज सरो वैद्य मरो,                      उगाच म्हण नाही रूजली;
                                    दरोडे घालत फिरला असता,            डॉक्टरकिची झाली नसती खुजली!
                                    संरक्षणाचा कायदा लावता,              रुग्णाचा होतो पटकन ग्राहक;
                                    मग डॉक्टरकिचा धंदा झाला,           तर कशास ओरड नस्ति नाहक?
                                    त्याचे घर सदैव काचेचे,                   हाती तुमच्या दगड भारी,
                                    पैसे कमी करा डॉक्टर,                     आताच आलय दारिद्र्य घरी!
                                    तपासण्याचे रिपोर्ट बघताच,            वाटते डॉक्टरची वाचा खरी;
                                    पण खर्चास मला लावला म्हणुन     वाढती भाषणे घरोघरी!
                                    मागे आड़ पुढे विहीर,                      डॉक्टरची होते गोची;
                                    पेशेंट आपला मुक्त पक्षी,               मारत फिरतो सतत चोची!
                                    आपल्या घरी आजचा मुक्काम,      डॉक्टर करतो पाहुणचार;
                                    सेवा करून घेवून पूर्ण,                    पाहुणा शोधतो पुढचे दार!
                                    डॉक्टर-पेशेंट नाते आता	                बसतय सुईच्या टोकावर;
                                    कायदे आले 'धंदा' झाला,               विश्वास बसलाय 'कागदावर'!
                                    तुमचा हातगुण आमचे नशीब,        म्हण आता लोप पावली;
                                    नाडी बघुन निदान होण्याची,          गोष्ट मागच्या युगात घडली!